राज्यात धो-धो पावसाचा इशारा! पुणे, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना IMDचा अलर्ट


पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी-अधिक प्रमाणात कोसळत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. सातारा, पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने सातारा, पुणे आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी पावसाचा इशारा दिला आहे. तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही पावसाची शक्यता असून, रात्रभर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. विदर्भातही अनेक ठिकाणी सतत पाऊस सुरू आहे.

हवामान विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 6 ते 9 ऑगस्टदरम्यान पश्चिम मध्य प्रदेशात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच 5 ते 9 ऑगस्टदरम्यान पूर्व मध्य प्रदेशात आणि 4 ते 9 ऑगस्टदरम्यान देशातील विविध राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे बहुतांश नद्या-नाले वाहू लागले आहेत. 13 पैकी 11 तालुक्यांतील 91 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या जिवंत जलसाठ्यात अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. धरणातील जिवंत जलसाठा शून्य टक्केच असून, मराठवाडा भागात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीसाठा वाढलेला नाही.

सध्या केवळ धामणा नदीला प्रवाह सुरू झाला असला तरी खडकपूर्णा धरण अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ऑगस्ट महिना सुरू होऊनही धरणात शून्य टक्के जलसाठा असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे धरणात केवळ 200 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली असून, समाधानकारक साठ्यासाठी अजून पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोकणातही पाऊस सुरू असून नदी खोऱ्यांत समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेड येथील जगबुडी नदीची पातळी 5.40 मीटरवर पोहोचली असून ती इशारा पातळीच्या वर गेली आहे. दरम्यान, कोकणात पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!