मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा? सोशल मीडियावरील एका पोस्टने उडवली खळबळ; पोलिसांची चौकशी सुरू

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुंबईत कथित दहशतवादी हल्ल्याबाबत दावा करणारी एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. संबंधित पोस्टमध्ये ऑगस्ट महिन्यात भारतासाठी धोका असल्याचा दावा करण्यात आला असून, तिची सत्यता तपासली जात आहे.
ही पोस्ट इंग्रजीत असून यात “India shall be careful in the month of August 2026…9th to 18th August very dangerous time period…Big terrorist attacks possible by Pakistani. Terrorists. असे म्हटले आहे. अनेकांनी ही पोस्ट रिशेअर देखील केली.

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्यानंतर काही नागरिकांनी ती मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित पोस्टची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे. पोस्टमागील व्यक्तीकडे या दाव्याला आधार देणारी कोणती माहिती आहे का, याचाही तपास केला जात आहे.


गेल्या काही काळात मुंबई पोलिसांना विविध धमकीचे फोन, ई-मेल आणि सोशल मीडियावरील संदेश प्राप्त होत आहेत. अशा प्रत्येक प्रकरणाची पोलिसांकडून पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवा किंवा अप्रमाणित सोशल मीडिया पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास ती तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत माहिती मिळण्यासाठी केवळ पोलिस आणि सरकारी यंत्रणांकडून जारी करण्यात येणाऱ्या निवेदनांवरच विश्वास ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या या सोशल मीडिया पोस्टबाबत चौकशी सुरू असून, अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत कोणत्याही अप्रमाणित दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.