‘मराठ्यांच्या लेकींवर बोलणं पडलं महागात!’ वाघमारेंच्या वक्तव्याने वाद पेटला; जरांगेंचा थेट इशारा, ‘आता सुट्टी नाही’

जालना : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. वाघमारेंच्या विधानावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, त्यांनी वाघमारेंना थेट आव्हान दिले आहे. “मी कितीही संतापलो तरी कुणाच्या लेकीबाळींवर किंवा महिलांवर बोलत नाही,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच, “मराठ्यांचे पोट्टेही सोपे नाहीत. आता सुट्टी नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी आपण नेते आणि त्यांच्या भूमिकांवर टीका करतो, मात्र महिलांना लक्ष्य करत नसल्याचे सांगितले. “मी इतका बोलतो, मात्र कुणाच्या लेकीबाळींवर, महिलांवर बोलत नाही. मी कुणाच्या समाजाबाबतही बोलत नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली. वाघमारे यांच्या वक्तव्यावर टीका करताना जरांगेंनी अत्यंत आक्रमक भाषेचा वापर केला. यावेळी त्यांच्या वक्तव्यात काही आक्षेपार्ह शब्दही आले.

‘भाषेची पातळी घसरली’ या टीकेवरही उत्तर जरांगे यांच्या वक्तव्याची भाषा खालच्या पातळीवर गेल्याची टीका होत असताना त्यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिले. “मी काय आई पळून गेली असं म्हटलं का? मी कुणाच्या घरात घुसलो असं म्हटलं का? मी जे बोलतो ते नेत्यांना बोलतो,” असे ते म्हणाले. आपल्याला किंवा आपल्या समाजाला उद्देशून करण्यात आलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना आपण महिलांवर किंवा कुटुंबातील सदस्यांवर बोलत नसल्याचा दावा त्यांनी केला.


वाघमारे यांच्या भाषणातील विधानामुळे वाद जालन्यात समाजबांधवांसमोर बोलताना नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही ओबीसी नेत्यांच्या कुटुंबांचा संदर्भ दिला. “अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत,” असा दावा त्यांनी केला. तसेच ओबीसी नेत्यांची “सुंदर मुलं आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्या,” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. या विधानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला.
वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडताना, “आम्ही आता मराठा झालो आहोत. आमचे सगेसोयरे मराठा झालेत. आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्या आहेत,” असेही म्हटले. ओबीसींच्या प्रश्नांवर मंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगत त्यांनी ओबीसी समाजासाठी लढण्याची भूमिका जाहीर केली.
मराठा संघटना पोलिसांत दाखल वाघमारे यांच्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार देत वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे वाघमारे यांच्या वक्तव्याने सुरू झालेला वाद आता पोलिसांत पोहोचला असून, पुढील काळात या प्रकरणावर प्रशासन आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.