सोनवणेंच्या आरोपांनी बीडचं राजकारण तापलं, त्याच दिवशी मुंडे फडणवीसांच्या भेटीला; शेतकऱ्यांसाठी केली मोठी मागणी

मुंबई : बीडमध्ये विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच गुरुवारी दिवसभरात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सकाळी खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करत कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर ऐकवली. तर दुसरीकडे, संध्याकाळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. या भेटीत मात्र बीडमधील राजकीय आरोपांऐवजी राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी महत्त्वाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत केंद्राच्या पीएम-किसान आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील किमान दोन हप्ते सर्व पात्र शेतकऱ्यांना एकत्रितपणे देण्यात यावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक संकटात असून त्यांना तातडीची मदत मिळावी, यासह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि जलसंधारणाच्या कामांबाबतही मुंडे यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. शेतकरी आणि शेतमजुरांना या संकटातून उभं करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे मुंडे यांच्या भेटीनंतर सांगण्यात आले.


दरम्यान, या भेटीच्या काही तास आधी बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विलास घुले हत्या प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, वाल्मिक कराडने कारागृहातून सुग्रीव कराडशी संपर्क साधला आणि आपल्या मुलाविरोधात कारवाई करण्याबाबत चर्चा केली. यासंदर्भातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिपही सोनवणे यांनी माध्यमांसमोर ऐकवली. या क्लिपची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोनवणे यांनी केलेल्या या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
सोनवणे यांनी याच पत्रकार परिषदेत आपल्या आणि धनंजय मुंडे यांच्या जुन्या राजकीय संबंधांचाही उल्लेख केला. धनंजय मुंडेंना विधान परिषद मिळावी यासाठी आपण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पाय धरले होते, तसेच २०१४च्या निवडणुकीत आर्थिक मदत केली होती, असा दावा त्यांनी केला. धनंजय मुंडेंनी खासदार होण्यासाठी आपल्यालाही मदत केली होती, असंही सोनवणे म्हणाले.
दुसरीकडे, दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २ ऑक्टोबरला मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन ते पिकांची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
त्यामुळे एकीकडे बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पंचनामे, तातडीची आर्थिक मदत, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था याबाबत सरकारकडून पुढील काळात कोणते निर्णय घेतले जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
