मतदानाआधीच ठाण्यात महायुतीचा ‘विजयाचा गुलाल’! मविआ उमेदवाराची माघार, एकनाथ शिंदेंच्या विश्वासू रवींद्र फाटकांचा मार्ग मोकळा


ठाणे : ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीत मतदानाची वेळ येण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय विजय आपल्या नावावर केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रंगतदार लढतीची अपेक्षा असलेल्या या निवडणुकीत अचानक घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे संपूर्ण समीकरणच बदलले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना रंगणार असल्याचे चित्र होते. महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट)चे रवींद्र फाटक, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अभिजित पवार मैदानात उतरले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

मात्र अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. अभिजित पवार यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला. वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयानंतर निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलले असून रवींद्र फाटक हे रिंगणातील एकमेव उमेदवार उरले आहेत.

विशेष म्हणजे या जागेवर उमेदवारी देताना महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात काही प्रमाणात चर्चा आणि रस्सीखेच झाल्याची चर्चा होती. मात्र वरिष्ठ नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली आणि रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कोणतीही बंडखोरी किंवा अपक्ष आव्हान उभे राहिले नाही.

रवींद्र फाटक यांना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे मानले जाते. यापूर्वीही त्यांनी विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवत आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्याच पारड्यात वजन असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात होते.

अभिजित पवार यांच्या माघारीनंतर आता निवडणूक प्रत्यक्षात होण्याची गरजच उरलेली नाही. अधिकृत प्रक्रियेनंतर रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होणार असून हा विजय मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यासाठीही महत्त्वाचा राजकीय संदेश मानला जात आहे.

दरम्यान, ठाणे आणि पालघरमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या घडामोडीनंतर आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली असून मतदानाआधीच विजयाचा जल्लोष रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!