अखेर वाल्मिक कराडचा पर्दाफाश! सर्वात मोठा पुरावा पोलिसांना सापडला..

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाने महाराष्ट्र चांगलाच संतापला आहे. या हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे.
या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत वाल्मिक कराडने कोणाकडूनही थेट खंडणी मागितली नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. मात्र, पोलिसांच्या हाती लागलेल्या नव्या पुराव्याने हा युक्तिवाद धुळीस मिळवला आहे.
तसेच वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीकडून मागण्यात आलेली २ कोटी रुपयांची खंडणी यासंदर्भात पोलिसांना एक ठोस पुरावा मिळाला आहे. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी या व्हिडीओचा उल्लेख केला आहे. यात खंडणीची मागणी कशी झाली आणि कोणाच्या आदेशावर ही मागणी करण्यात आली, याची स्पष्ट माहिती मिळाली आहे.
दरम्यान, सुदर्शन घुले नावाच्या व्यक्तीला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
या व्हिडीओमध्ये सुदर्शन घुले कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगतो की, १०० लोक सांभाळण्याऐवजी एक कराड सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी मागितलेले २ कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरळीत होईल.
व्हिडीओमध्ये सुदर्शन घुले हा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देताना दिसत आहे. गेल्यावेळी मी आलो होतो, तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार दिली होती. ही बाब वाल्मिक अण्णांना समजली आहे आणि ते तुमच्यावर संतापले आहेत. त्यामुळे त्वरित मागणी पूर्ण करा, नाहीतर तुमचे काम बंद केले जाईल,” असे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे.
मात्र आता या नव्या पुराव्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात थेट खंडणी मागण्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता, मात्र या व्हिडीओमुळे त्याच्या संलग्नतेला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे न्यायालयात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडू शकतो.