Uruli Kanchan : पूर्व हवेलीत दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा कहर! नर्सरी व्यावसायिकांची हरितगृहे उखडून करोंडोचा माल चिखलात..

Uruli Kanchan : उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वादळी पावसाने सोरतापवाडी व आळंदी म्हातोबा या परिसरात नर्सरी व्यावसायिकांना चांगलाच दणका दिला असून वादळाने या परिसरातील ३० हून अधिक हरितगृहांचे प्रचंड नुकसान होऊन जमीनदोस्त झाले आहेत. या हरितगृहांतील करोडो रुपयांचा विक्री साठी आलेला माल मातीमोल झाला असून या वादळी पावसाने काही व्यावसायिकांचा अर्थिककणा मोडला आहे.
पूर्व हवेली तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व वळीव पावसाने चांगलेच झोडपले आहे. वळती, शिंदवणे ,तरडे व आळंदी म्हातोबा या गावच्या शेत पिकाला व खाजगी मालमत्ते ला चांगला तडाखा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीसोमवारी (दि.२०) रोजी वादळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सायंकाळी ६च्या नंतर वादळी वाऱ्याला प्रचंड वेग असल्याने सोरतापवाडी, आळंदी – म्हातोबा या परिसरात अनेक वर्षापूर्वीची झाडे जमीनदोस्त झाली. तर नर्सरी व्यावसायिकांची हरिगृहांची पडझड होऊन पावसाचा मारा रोपवाटिकांना बसून रोपवाटिकांचे नुकसान झाले आहे.
सोरतापवाडी व आळंदी म्हातोबा गावातील तब्बल ३० हून अधिक हरितगृहांना झळ बसून करोडोंचा मालाचा चिखल झाला आहे. सोरतापवाडी गावात वादळी पावसाने दोन घरांचे नुकसान झाले आहे. तर एका गोठ्याचे पत्रे उडाले आहेत. एक सोलर सेट वादळाने उडाला आहे. आळंदी म्हातोबा येथे एका घरावर वीज कोसळली आहे. सुदैवाने घरात कोणीच नसल्याने अनेकांचा जीव वाचला आहे.
दरम्यान या आपत्तीची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी या भागाला भेटी दिल्या आहेत. त्यांनी अनेक नर्सरी व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांनी या भागातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे. काही घरे, भिंती व गोठे नुकसान झालेल्या गरजूंना प्रदिप कंद यांनी वैयक्तिक १ लाखांची तत्काळ मदत देऊ केली आहे. हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनीही या भागाला भेट देऊन महसूल व कृषी विभागांना सर्व पंचनामे पूर्ण करण्याचा सूचना दिल्या आहेत.
एका व्यावसायिकाचे पाच लाखांहून अधिक नुकसान
वादळी पावसाने हरितगृहे जमीनदोस्त झाल्याने किमान एका छोट्या व्यावसायिकाचे पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे या परिसरात १० गुंठ्यापासून दोन एकरापर्यंत हरितगृहे आहेत. या वादळाने आळंदी म्हातोबा येथील डी.पी.जवळकर या एकाच व्यावसायिकाचे तब्बल दिड कोटीचे नुकसान झाले आहे. या व्यावसायिकाने परदेशातून रोपवाटिका आणून विक्रीसाठी तयारी केली होती. परंतु वादळाने हातातोंडाचा घास हिरावला आहे.
कृषी नियमांत शेतीपुरक व्यावसायाचा सामावेश नाही
नैसर्गिक आपत्तीत महसुल विभागाकडून शेती पिकांचे , मालमत्ता नुकसीनीचे पंचनामे होऊन कृषी निकषानुसार नुकसान भरपाई अदा केली जात आहे. मात्र कृषी नियमात शेतीपुरक व्यवसाय असलेला नर्सरी व्यावसायातील रोपवाटिका नुकसान व हरितगृहे नुकसान यांच्या नुकसानीचा कृषी नियमांचा सामावेश नाही. त्यामुळे दरवर्षी आपत्ती होऊन व्यावसायिकांना अर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
खाजगी मालमत्ता व शेती पिकांप्रमाणे या व्यावसायाला मदत मिळणे आवश्यक आहे. कृषी निकषांत बदल करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ.अशोक पवार यांनी सांगितले. तर कृषी नियमांत रोपवाटिका व स्ट्रक्चर यांचा सामावेश करावा म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे प्रदिप कंद यांनी सांगितले.