दुधात युरिया-डिटर्जंटचा खेळ उघड; भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंचा कडक बडगा

मुंबई : राज्यातील दूध व्यवसायात वाढत असलेल्या भेसळीच्या प्रकारांवर लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठे पाऊल उचलले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेवर आता कडक नजर ठेवली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील दूध उत्पादक, संकलन केंद्रे, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार आणि विक्रेत्यांसाठी नवीन अनुपालन नियम लागू करण्याचे आदेश दिले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
तपासणीत धक्कादायक प्रकार उघड

एफडीएच्या तपासणीत काही ठिकाणी अधिक नफा मिळवण्यासाठी दुधात पाणी मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच दुधाचा दर्जा कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज आणि मेलामाइन यांसारख्या रसायनांचा वापर होत असल्याचेही आढळून आले आहे.
याशिवाय SNF (Solid Not Fat) आणि Milk Fat या मानकांचे उल्लंघन, Aflatoxin M1 या विषारी घटकाचे वाढलेले प्रमाण, प्रतिजैविकांचे अवशेष (Antibiotic Residues), शीतसाखळीचे पालन न करणे, विनापरवाना व्यवसाय आणि चुकीचे लेबलिंग अशा अनेक गंभीर त्रुटी तपासणीत निदर्शनास आल्या आहेत.

संपूर्ण पुरवठा साखळीवर राहणार नजर
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, दूध उत्पादनापासून ते ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण अधिक कडक केले जाणार आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांनाही सावध राहण्याचे आवाहन केले आहे. दूध खरेदी करताना सीलबंद आणि सुरक्षित पॅकेजिंग असलेलेच दूध घ्यावे. पॅकेटवरील उत्पादन दिनांक, ‘Best Before’ तारीख आणि FSSAI परवाना क्रमांक तपासावा. उघड्यावर किंवा संशयास्पद ठिकाणी विकले जाणारे दूध खरेदी टाळावे. कच्चे दूध वापरण्यापूर्वी ते व्यवस्थित उकळावे. तसेच घरच्या घरी पाणी, स्टार्च किंवा साबणासारखा वास यासाठी प्राथमिक चाचणी करून भेसळीचा संशय आल्यास तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई
दूध हा प्रत्येक घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणे ही काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील दूध व्यवसाय अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि दर्जेदार करण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, भेसळमुक्त दूध पुरवठ्यासाठी प्रशासनासोबतच ग्राहकांनीही सतर्क राहण्याची गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.