राज्यात अवकाळीचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी पावसाचा फटका, लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत..

सोलापूर : अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला असून तेथील शेतीला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. यामुळे हाताला आलेली पीक वाया गेली असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. यामुळे मदतीची मागणी केली जात आहे.
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास येथील टरबूज बाग उद्ध्वस्त होऊन मातीमोल झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने राज्यात पावसाचा यलो अलर्ट दिला होता. आता पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
अशा अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग नेस्तनाबूत झाली आहे. बार्शी तालुक्यातील राळेरास मधील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांची साधारण एक एकर टरबूजाला याचा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.
तसेच कराड, पाटणा मिरज, सांगली शहराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मिरज शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे मिरज शहरामध्ये काही वेळातच अवकाळी पावसाने दाणादान उडवून दिली.
तसेच सातारा जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. यामुळे काढणीला आलेला गहू मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे. सांगली शहराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. प्रचंड वादळी वाऱ्यासह सांगली शहरामध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे. वादळी वारा व पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लाइट गेली होती.
तसेच कोल्हापूरमध्येही काल रात्री तासभर मुसळधार पाऊस पडला. अवकाळी आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. येणाऱ्या काळात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तापमान वाढत चालले असून शेतकरी पीक जगवत असताना अशा प्रकारे त्याला नुकसान सोसावे लागत आहे.