वाढदिवसाची पार्टी करून परतताना डंपरने कारला दिली धडक ; सहा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू…!

चंदीगड : गुरुग्राम-फरीदाबाद रस्त्यावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व जण पलवलच्या कॅम्प परिसरातील रहिवासी होते. सर्वजण गुरुग्रामहून वाढदिवसाची पार्टी करून पहाटे दीडच्या सुमारास परतत असताना क्रशरने भरलेल्या डंपरने तरुणाच्या कारला धडक दिली.

आरोपी चालकाला धडक देऊनही तो डंपर थांबविण्याऐवजी पळतच राहिला. सर्व तरुण कारसह डंपरच्या पुढील दोन चाकांमध्ये अडकले. सुमारे 100 मीटरपर्यंत ओढल्या गेल्याने कारचा स्फोट झाला आणि सर्व तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढला.
आरोपी डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे. विशाल सेठी (18), पुनीत (27), बलजीत (27), जतीन (26), संदीप (28) आणि आकाश उर्फ नोनी (29, रा. जवाहर नगर कॅम्प, पलवल) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण गुरुग्रामहून पलवलला जात होते. सर्व मित्र होते आणि जवाहरनगर कॅम्पमध्ये राहत होते. कारचे मोठे नुकसान झाले असून सर्व तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकले आहेत. पोलिसांनी गॅस कटर व इतर उपकरणांनी कार कापून सर्वांना बाहेर काढले.

रुग्णालयात डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. आरोपी डंपर चालकाने कार कित्येक मीटरपर्यंत ओढून नेली. माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला नाकाबंदी केली. स्वत:ला अडकल्याचे पाहून आरोपी चालकाने डंपर घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावर सोडून पळ काढला.
