निवडणूक आयोगातील मतभेदांचं वृत्त समोर येताच उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी


मुंबई : निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांबाबत इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. वृत्तानुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील काही निर्णयांवर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले. मतदार यादीतील नावे जोडणे-वगळणे आणि निवडणूक यंत्रणेतील तांत्रिक व्यवस्थेबाबतही दोन्ही आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

या वृत्तानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला.

निवडणूक आयुक्तांची निवड का होत नाही?

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील आणि राजकीय पक्षांमधील लोकशाही कशी राबवली जाते, हे पाहण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होते; मात्र त्यांची निवडणूक का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मग हा कोणाच्या मर्जीने नेमला जातो? कोण नेमतो याला?, असा सवाल करत ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

सुखबीर संधू आणि विवेक जोशी यांनी धाडस दाखवलं

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप नोंदवल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. सुखबीर संधू आणि विवेक जोशी, तुम्ही धाडस दाखवलं, असं ठाकरे म्हणाले.

तसेच माध्यमांनी या प्रकरणावर अधिक ठामपणे भूमिका मांडण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. “चॅनलने त्या भयातून बाहेर येणं गरजेचं आहे,” असं ठाकरे म्हणाले.

लोकशाहीचा होत असलेला हा खून जनतेसमोर आला पाहिजे

तुम्ही लोकशाहीचे आधारस्तंभ आहात. लोकशाहीचा होत असलेला हा खून, पक्ष फोडणारी दरोडेखोरांची टोळी याचा पर्दाफाश जनतेसमोर आला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमच्यात एकमत करा, लोकशाही वाचवा. आम्ही लढतच आहोत. आम्ही विरोधी पक्ष जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनता आता नुसती ‘मन की बात’ ऐकणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

ज्ञानेश कुमारांना तात्काळ तुरुंगात टाकलं पाहिजे

निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबतही उद्धव ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला. इथल्या निवडणूक आयुक्तांना विचारलं, ते बोलतात आमच्याकडे पॉवर नाही. मग पॉवर कोणाकडे आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

पुढे ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी करत, ज्ञानेश कुमारांना तात्काळ तुरुंगात टाकलं पाहिजे, असं वक्तव्य केलं. तसेच महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका रद्द करून या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या वृत्तावर आयोगाकडून सर्व निर्णय एकमताने घेतले जात असल्याची भूमिका मांडण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!