सोरतापवाडीत कंटेनरला दुचाकीची पाठीमागून धडक ; डाळिंब येथील तरुणाचा जागीच मृत्यू

उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर दुभाजकावरून वळण्यासाठी उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकी चालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत डाळिंब (ता. दौंड) येथील दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पुलावर बुधवारी (ता. 07) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
स्वप्निल सुनील मस्के (वय-23 रा. डाळिंब ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अश्वजीत मोहोड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल मस्के हे पुण्यावरून उरुळी कांचनकडे उशिरा निघाले होते. यावेळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पुलावर आले असता त्या ठिकानी एक कंटेनर हा दुभाजकावरून वळण्यासाठी थांबला होता.
यावेळी स्वप्निलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व समोर असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. दरम्यान, या धडकेत स्वप्निलच्या अंगाला जबर दुखापत झाली होती. व या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने उरुळी कांचन व डाळिंब परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस शिपाई अश्वजीत मोहोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वप्निलवर गु.र.नं. १४६/२०२४ अन्वये बी.एन.एस. २०२३ मधील कलम २८१, १२५(ब), १०६(१), ३२४(४) व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.