शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये 2 सापांचा शिरकाव! 8 फुटांचा धामण रेस्क्यू, दुसरा साप पसार


मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात सोमवारी रात्री दोन साप आढळल्याने खळबळ उडाली.

17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजता साप फिरत असल्याची माहिती सर्पमित्र विक्की दुबे यांना फोनवरून मिळाली. त्यांनी तातडीने वन विभागाचे राऊंड ऑफिसर दीपक गायकवाड आणि मुंबई रेंज ऑफिस, ठाणे येथील कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच विक्की दुबे घटनास्थळी दाखल झाले. ‘मन्नत’ बंगल्याच्या पटांगणात एका शिडीखाली पाहणी केली असता सुमारे आठ फूट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप आढळून आला. हा साप वेटोळे घालून बसला होता.

सर्पमित्र विक्की यांनी कोणतीही इजा न करता अत्यंत सुरक्षित पद्धतीने या सापाला रेस्क्यू केले. मात्र, परिसरात लोकांची चाहूल लागताच दुसरा साप तिथून निसटून गेला. हा साप नेमका कुठे गेला, याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात आला. मात्र, बराच शोध घेऊनही तो साप आढळून आला नाही.

‘मन्नत’ बंगल्याच्या परिसरात दोन साप आढळल्याची माहिती मिळताच सुरक्षारक्षक आणि बंगल्यातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रेस्क्यू करण्यात आलेला साप बिनविषारी धामण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सापाला रेस्क्यू केल्यानंतर सर्पमित्रांनी उपस्थितांना धामण सापाबाबत माहिती देत घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगितले. धामण हा बिनविषारी साप असून तो प्रामुख्याने उंदीर, बेडूक यांसारख्या प्राण्यांवर उपजीविका करतो. त्यामुळे मानवी वस्तीत असा साप आढळल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षितपणे रेस्क्यू करणे महत्त्वाचे आहे.

‘मन्नत’सारख्या गजबजलेल्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरात दोन साप आढळल्याने या घटनेने काही काळ सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धामण हा वेगाने हालचाल करणारा साप असल्याने तो सहसा माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला रेस्क्यू करताना विशेष काळजी घ्यावी लागते.

रेस्क्यू करण्यात आलेल्या सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. मात्र, दुसरा साप अद्याप सापडलेला नसल्याने ‘मन्नत’ परिसरातील सुरक्षारक्षकांकडून खबरदारी घेतली जात असल्याचे समजते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!