पुण्यात पहिल्यांदा जिथे चायनीज खाल्लं, तिथेच पुन्हा जाणार; तुकाराम मुंढेंच्या ‘नेक्स्ट टार्गेट’च्या चर्चेला उधाण

पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका वक्तव्यामुळे पुण्यातील खाद्यविक्रेत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पुण्यातील आपल्या जुन्या आठवणी सांगताना मुंढे यांनी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज खाद्यपदार्थ कुठे खाल्ला, याचा किस्सा सांगितला. आता त्याच भागात पुन्हा जाऊन पाहण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सुरुवातीच्या काळात त्यांचा शहराशी फारसा परिचय नव्हता. बीएनंतर एमएच्या प्रवेशासाठी ते पुण्यात आले होते. मात्र, विद्यापीठाच्या वसतिगृहात जागा न मिळाल्याने त्यांना परतण्याचा विचार करावा लागला. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि यूपीएससीच्या तयारीसोबत एमएचे शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यात जयकर ग्रंथालयात अभ्यास करताना मित्राच्या खोलीत राहण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. तिथे असलेल्या ढेकणांमुळे झोप येत नसल्याचा किस्साही त्यांनी मिश्कीलपणे मांडला.

याच मुलाखतीत पुण्यातील खाद्यसंस्कृतीबाबत बोलताना त्यांनी पाषाण रोड आणि बापट रोड परिसरातील चायनीजच्या गाड्यांची आठवण सांगितली. चायनीज खाद्यपदार्थ म्हणजे नेमकं काय, याची कल्पना नसतानाही तिथे पहिल्यांदा चायनीज खाल्ल्याचे त्यांनी सांगितले. आता या भागात पुन्हा जाऊन पाहावे, असा विचार मनात असल्याचे ते म्हणाले.


दरम्यान, गेल्या काही काळात अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांविरोधात कारवाया वाढल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चायनीज खाद्यपदार्थ आणि रस्त्यावरील खाद्यविक्रीकडेही लक्ष देण्याचे संकेत मुंढे यांनी दिले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आता पुण्यातील चायनीज खाद्यविक्रेत्यांची तपासणी वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, नेमकी कोणती कारवाई किंवा मोहीम राबवली जाणार, याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.