तुकाराम मुंढेंच्या FDA टीमचा भेंडीबाजारात दणका! घाणेरडे किचन, किटकांचा वावर; मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित


पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. FDA आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर अनेक ठिकाणी तपासण्या आणि धडक कारवाया करण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबईतही FDAने मोठी कारवाई केली आहे. भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

यामध्ये शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान या हॉटेल्समध्ये स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन आढळून आले. स्वयंपाकघरात अस्वच्छता, कीटकांचा वावर तसेच पिण्याच्या पाण्याबाबत नियमांचे पालन न केल्याचे समोर आले.

FDAच्या तपासणीत कच्च्या मालाच्या नोंदी आणि खाद्यतेलाच्या गुणवत्तेशी संबंधित नोंदी उपलब्ध नसल्याचेही आढळले. त्यामुळे संबंधित हॉटेल्सवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय अमरावतीतील ‘अमरावती दरबार’ या हॉटेलला वैध अन्न परवाना नसताना व्यवसाय सुरू असल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

FDAने स्पष्ट केले आहे की, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

हॉटेल्ससाठी FDAचे महत्त्वाचे नियम

ग्राहकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. बाटलीबंद पाणी घेण्याची सक्ती करता येणार नाही.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठवणूक व स्वयंपाक स्वतंत्र पद्धतीने करणे आवश्यक आहे.
तळण्यासाठी वापरलेले काळे किंवा खराब झालेले तेल पुन्हा वापरण्यास मनाई आहे.

अन्नपदार्थ वृत्तपत्रात पॅक करता येणार नाहीत; त्यासाठी फूड-ग्रेड पॅकिंग साहित्य वापरणे आवश्यक आहे.
किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच स्वयंपाकघरात तंबाखू, गुटखा खाणे आणि थुंकण्यास बंदी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!