तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! FDA मध्ये रुजू होताच भेसळखोरांचे धाबे दणाणले; अवघ्या 3 दिवसांत राज्यभर 53 धाडी, 33 आरोपी गजाआड

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियमभंग करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या तीन दिवसांत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागात एकाच वेळी छापेमारी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 53 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून 34 आस्थापनांमध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी 25 गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरली जाणारी पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 27 आस्थापनांवर थेट सीलची कारवाई करण्यात आली. मुंबई विभागात सर्वाधिक मोठी कारवाई झाली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये प्रतिबंधित पदार्थ, सुगंधित तंबाखू आणि दिशाभूल करणारे पॅकिंग साहित्य आढळून आले.

याशिवाय FDA ने दूध, तूप, पनीर, खवा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, बेकरी पदार्थ, आईस्क्रीम, पॅकबंद पाणी आणि शीतपेयांचीही तपासणी केली. या कारवाईत सुमारे 28.78 लाख रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

25 मे रोजी पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर FDA यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र दिसत असून राज्यभरातील भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.