“एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर?” प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं मन जिंकणारं उत्तर

पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे त्यांच्या आक्रमक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे चर्चेत आहेत. राज्यातील दूध, पनीर, दही यांसह विविध अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी त्यांनी मोठी मोहीम सुरू केली आहे.

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या स्वयंपाकघरांची तपासणी करण्यात येत असून, अस्वच्छता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी परवाने निलंबित करण्यात आल्याने भेसळ आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलीच्या चर्चांना पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होती. मात्र या चर्चांना शासनाकडून पूर्णविराम देण्यात आला असून, त्यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय किंवा हालचाल सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या कामाच्या पद्धतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘नायक’ चित्रपटाच्या प्रश्नावर मुंढेंचे उत्तर चर्चेत
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांना नायक चित्रपटाचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला होता की, “तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्रीपद आणि सर्व अधिकार मिळाले तर तुम्ही काय कराल?”

यावर उत्तर देताना मुंढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत कोणाकडेही अमर्याद अधिकार नसतात. एक सनदी अधिकारी म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडणे हेच महत्त्वाचे आहे.
“प्रशासनात कोणतीही जबाबदारी मिळाली तरी काम अधिक पारदर्शक कसे होईल आणि प्रत्येक टप्प्यावर सुधारणा कशी करता येईल, यावर माझा भर राहील. मी शासकीय सेवक आहे आणि माझ्या कायदेशीर मर्यादांची मला जाणीव आहे. जनता मला ‘नायक’ मानत असेल तर त्यांचा मी ऋणी आहे,” असे त्यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे यांच्या कारवाया आणि स्पष्ट भूमिकेमुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबद्दल विश्वास आणि आदर वाढताना दिसत आहे.