प्रसूतीच्या गोंधळातून रुग्णालयात राडा; डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या नगरसेवकाला अखेर अटक


डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईनंतर त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह अटक केलेल्या तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना एका प्रसूतीच्या प्रकरणातून समोर आली होती. शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेच्या नवजात बाळाला अतिदक्षता विभागातील खाटेची गरज होती. मात्र रुग्णालयातील सर्व खाटा भरल्याने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. यावरून रुग्णाच्या नातेवाईक आणि नगरसेवकांमध्ये वाद झाला. त्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

रुग्णालयातील चित्रफित समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून निषेध केला. तसेच या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी लोकप्रतिनिधींकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांवर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण आणि गंभीर स्वरूपाच्या आरोपांखाली गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!