विधान भवनात ‘पॉवर मीटिंग’! कॅबिनेट सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधान भवनात घडलेल्या एका भेटीने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीतून काही वेळ बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या बंद दालनातील चर्चेने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे हे अचानक शरद पवार यांच्या कार्यालयात पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर शिंदे पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. मात्र, या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीपूर्वीच शिंदे आणि पवार यांची भेट झाल्याने या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख आमदार उपस्थित आहेत. शरद पवार या बैठकीत आमदारांशी विविध राजकीय घडामोडींवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतराच्या घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी आघाडीतील संभाव्य जवळिकीबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणीत आघाडीसोबत जाणार का, याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र, पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजची एकनाथ शिंदे-शरद पवार भेट ही केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे मोठे राजकीय गणित आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडींमधूनच या भेटीचा खरा अर्थ स्पष्ट होणार आहे.