TTEने तिकीट मागितलं अन् तरुणीने स्वतःचे कपडे फाडले; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल…

नवी दिल्ली : ट्रेनमध्ये तिकीट नसेल तर TTE दंड करतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेस (12792) मध्ये एक असा प्रकार घडला आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दानापूरहून प्रयागराजला जाणाऱ्या एका तरुणीकडे AC 2-टायर कोचचे तिकीट नसल्याचे सांगितले जात आहे. TTE ने तिकीट मागितल्यानंतर तिने जे केले, त्यामुळे ट्रेनमधील प्रवासीही हैराण झाले.
नेमकं काय घडलं?
ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे TTE तिकीट तपासत होता. त्याने या तरुणीकडे तिकीट मागितले. मात्र, तिच्याकडे तिकीट नसल्याचे समोर आले. तिने तिकीट दाखवण्यास नकार दिला. TTE ने नियमानुसार तिकीट काढून दंड भरावा लागेल, असे सांगितले.

हे सांगताच ती तरुणी भडकली आणि TTE सोबत जोरजोरात वाद घालू लागली. भांडण वाढत गेल्यानंतर तिने TTE ला धमकावण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, “तू माझ्या भावाला ओळखत नाहीस, तो तुझ्यापेक्षा मोठा TTE आहे.”


तिने स्वतःचे नाव राधिका तिवारी असल्याचे सांगितले, तसेच तिच्या भावाचे नाव मुन्ना तिवारी असल्याचे सांगितले. “माझा भाऊ रेल्वेत आहे, तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकीही तिने दिल्याचा दावा करण्यात आला. TTE ने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्यास तयार नव्हती.
स्वतःचेच कपडे फाडायला लागली
यानंतर वाद आणखी वाढला आणि कथितरित्या त्या तरुणीने अचानक स्वतःचे कपडे ओढून फाडण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने TTE वरच गैरवर्तन आणि विनयभंग केल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली. तिने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावण्याची धमकीही दिल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकारादरम्यान TTE आणि तेथील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे समोर आले. या व्हिडिओमध्ये तरुणी स्वतःच कपडे फाडताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे TTE वरील आरोपांबाबत हा व्हिडिओ महत्त्वाचा पुरावा ठरल्याचे सांगितले जात आहे.
RPF ने ट्रेनमधून उतरवलं, 1000 रुपयांचा दंड
ट्रेन पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDDU) जंक्शनवर पोहोचल्यानंतर TTE ने रेल्वे सुरक्षा दलाला म्हणजेच RPF ला माहिती दिली. त्यानंतर RPF ची टीम ट्रेनमध्ये आली आणि संबंधित तरुणीला ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले.
खाली उतरवल्यानंतरही तिचा गोंधळ सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. तिथेही ती पोलिस आणि TTE यांचे व्हिडिओ बनवत होती आणि आरडाओरडा करत होती.
यानंतर RPF इन्स्पेक्टर अनिता कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी या तरुणीवर 1000 रुपयांचा दंड लावण्यात आला.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विना तिकीट प्रवास केल्यानंतर TTE सोबत वाद घालणे आणि त्यानंतर गंभीर आरोप करणे, यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणात व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यामुळे संपूर्ण घटनेचा क्रम समोर आल्याचे सांगितले जात आहे. अन्यथा TTE वर झालेल्या आरोपांमुळे त्याच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या असत्या, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.