मुंबईतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके आणि सीजेपीच्या अडचणीत मोठी वाढ, थेट वकिलाने पोलिसांत केली तक्रार


मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

काही बॉलिवूड कलाकारांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. आता या आंदोलनाप्रकरणी अभिजीत दिपके आणि सीजेपीच्या इतर नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. असे असतानाही सीजेपीने आंदोलन केल्याने स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला. आंदोलनामुळे परिसरातील शांतता भंग झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धी देवलेकर या वकिलांनी अभिजीत दिपके यांच्यासह सीजेपीच्या नेत्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सिद्धी देवलेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती. तरीही मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील शांतता भंग झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

शिवाजी पार्कमधील आंदोलनांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिलेल्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार, आवश्यक परवानगीशिवाय येथे आंदोलन करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असला, तरी त्यासाठी योग्य जागा निवडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करायचे असल्यास दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करता आले असते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, सिद्धी देवलेकर यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी आपल्या तक्रारीची दखल घेतल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात सुरक्षा आणि योग्य कारवाईची मागणी केली आहे. आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

दुसरीकडे, अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाजी पार्क येथील आंदोलनादरम्यानही त्यांनी सरकारवर टीका केली होती.

आता शिवाजी पार्क येथील आंदोलनावरून दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!