पवार कुटूंबात दुःखद घटना! शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे निधन…

पुणे : माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन झालं आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. भारती पवार यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे पवार कुटुंबात शोककळा पसरली आहे.
भारती पवार या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या जवळपास दीड वर्षांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत युगेंद्र पवार यांनी देखील माहिती दिली आहे. प्रतापराव पवार हे राजकारणापासून दूर आहेत.
प्रतापराव पवार हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते शरद पवार यांचे धाकटे बंधू आहेत. सकाळ माध्यम समूहाचे ते अध्यक्ष आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे.
याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट शेअर करत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.