‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’वर दुःखाचा डोंगर; लेखकाचे अपघाती निधन, मनोरंजनविश्वात शोककळा


मुंबई : मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या आणि आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या टीमवर शोककळा पसरली आहे.

या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. मात्र, पडद्यावर न दिसणाऱ्या अनेक कलाकारांचे आणि लेखकांचेही या कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाचे योगदान आहे. याच कार्यक्रमाच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले आहे. लेखन टीममधील सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही दुःखद माहिती दिली.

सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘हास्यजत्रेच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे रात्री एका अपघातात निधन झाले. विजय कुमार हे विनोदाची उत्तम जाण असणारे आणि ग्रामीण जीवनातील बारकावे हेरणारे मराठवाड्यातील एक होतकरू लेखक होते. ऐन तारुण्यात त्यांचे जाणे हे कलाक्षेत्र, हास्यजत्रा टीम आणि त्यांच्या मित्रपरिवारासाठी मोठा धक्का आहे. हास्यजत्रा टीम त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. विजय कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’

या पोस्टनंतर अनेकांनी विजय कुमार राख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने हास्यजत्रेच्या लेखन टीमसह मराठी मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पडद्यामागील कलाकारांचेही महत्त्वाचे योगदान

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. या कार्यक्रमातील कलाकार आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. प्रसाद ओक, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, समीर चौघुले यांच्यासह अनेक कलाकारांनी या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

या कार्यक्रमाच्या यशामध्ये लेखकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. सचिन गोस्वामी आणि अरविंद जगताप यांच्यासह अनेक लेखकांची टीम कार्यक्रमासाठी विनोदी लेखन करते. याच सृजन टीममध्ये विजय कुमार राख हे विनोदी लेखक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने हास्यजत्रेच्या पडद्यामागील सर्जनशील टीमचे मोठे नुकसान झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!