पतीसोबत भांडण, मध्यस्थी करण्यासाठी बोलावलं, फार्महाऊसवर नेलं अन् शस्त्राचा धाक दाखवून अत्याचाराचा आरोप; माजी आमदार नरेंद्र पवारांसह दोघांवर गुन्हा


भिवंडी : पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला; मात्र याच बहाण्याने विवाहित महिलेला फार्महाऊसवर नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे भिवंडी तालुक्यात खळबळ उडाली असून, कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिचा पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने नरेंद्र पवार यांनी तिला आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांनी तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील फार्महाऊसवर नेल्याचा आरोप आहे.

तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, फार्महाऊसवर शस्त्राचा धाक दाखवून महिलेला मद्य पाजण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. रात्री सुमारे दोन वाजता नरेंद्र पवार तेथून निघून गेल्यानंतर शैलेश पाटील यांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पहाटे चारच्या सुमारास अन्य एका व्यक्तीच्या मदतीने महिलेला तिच्या घरी सोडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांनी महिलेने मागितली मदत

घटनेनंतर भयभीत झालेल्या महिलेने १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. पीडितेने आपल्याकडे कथित घटनेशी संबंधित ध्वनिचित्रफिती आणि मोबाइलवरील संभाषण असल्याचे सांगितल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. त्यानंतर त्या महिलेला घेऊन रात्री पडघा पोलिस ठाण्यात पोहोचल्या.

पोलिसांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात सामूहिक लैंगिक अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, कांचन कुलकर्णी यांनी आरोपींना ४८ तासांत अटक करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास महिलांना सोबत घेऊन पडघा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपांबाबत पोलिसांकडून पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात आहेत. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाच्या आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!