लोणी काळभोरमध्ये ड्राय क्लिनिंगच्या दुकानातच अनर्थ! ४७ वर्षीय व्यावसायिकाचा गळफास; मित्र कामासाठी पोहोचला अन् धक्कादायक प्रकार उघडकीस, आजारपणाच्या नैराश्याची चर्चा


लोणी काळभोर : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात ड्राय क्लिनिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने दुकानातील आतील खोलीत गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २९) सकाळी सुमारे नऊ वाजता उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गुरुशांताप्पा सिद्धांप्पा मठ (वय ४७, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल काळभोर हे कामानिमित्त मठ यांच्या ‘अभंग ड्राय क्लिनिंग’ दुकानात गेले होते. त्यावेळी दुकानातील आतील खोलीच्या खिडकीला शर्टच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मठ आढळून आले. हा प्रकार दिसताच विशाल काळभोर यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने मठ यांना खाली उतरवून तातडीने लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

दरम्यान, गुरुशांताप्पा मठ हे मागील काही वर्षांपासून आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेमागे नेमके कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे वैद्यकीय कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून घटनेशी संबंधित माहिती संकलित केली जात आहे. गुरुशांताप्पा मठ यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!