रात्री घरी बनवलेली खिचडी खाल्ली अन् पहाटेच संकट कोसळलं! उलट्या-जुलाब सुरू, 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; बहिणीची मृत्यूशी झुंज, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं काय?


छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. विषबाधेमुळे कुटुंबातील सर्वांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत असताना दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत बालकाचे नाव आयुष नारायण थोटे असे आहे. त्याची सात वर्षीय बहीण गायत्री हिची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिंचोली लिंबाजी येथील नारायण साहेबराव थोटे (35), पत्नी देवशाला (30), मुलगी गायत्री (7) आणि मुलगा आयुष (2) या चौघांनी मंगळवारी रात्री घरी खिचडी खाल्ली होती. त्यानंतर बुधवारी पहाटे कुटुंबातील सर्वांनाच जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांनी सुरुवातीला स्थानिक पातळीवर उपचार घेतले.

मात्र, गुरुवारी प्रकृती अधिक खालावल्याने चौघांनाही गावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी सिल्लोड येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना गुरुवारी पहाटे सुमारे 5 वाजता आयुषची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

आयुषच्या मृत्यूने थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 12 वाजता वडील नारायण थोटे यांनी अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, आयुषची सात वर्षीय बहीण गायत्री हिची प्रकृतीही गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, आई देवशाला आणि वडील नारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांना अन्नविषबाधा झाल्याने या घटनेबाबत परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

कन्नड तालुक्यात यापूर्वीही बालकाचा मृत्यू

कन्नड तालुक्यात बालकाच्या मृत्यूची ही अलीकडील दुसरी घटना आहे. 4 सप्टेंबर रोजी करंजखेड येथे डेंग्यूची लागण झाल्याने 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता अन्नविषबाधेमुळे दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात चिंता व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!