महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी, 16 गावांचा संपर्क तुटला; पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे


पुणे : पुण्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून नाशिक घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला असून विहार आणि तुळसीनंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारे तीन तलाव पूर्ण भरले आहेत. सातही जलाशयांतील एकूण पाणीसाठा 62 टक्क्यांवर पोहोचल्याने पाणीकपातीचे संकट सध्या टळले आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला असून हडाणू–विवर लोकल सेवा ठप्प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सूर्या नदीकाठच्या 64 ते 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वारणा-चांदोली खोऱ्यातही मुसळधार पाऊस सुरू असून चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13 टक्के भरले असून पाणीसाठा 25.84 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.

हवामान विभागाने पुढील 48 तासांत मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!