धनगरांच्या ‘आक्रोशा’ने मुंबई दणाणली! आरक्षणासह अहिल्यादेवींच्या नावाची मागणी; पडळकरांचा सरकारला थेट इशारा

मुंबई : धनगर आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात जोर धरला आहे. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयावरही धनगर समाजाचा मोठा मोर्चा धडकला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारावे आणि वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने महामार्गाला जोडणाऱ्या मार्गाचे नामकरण करावे, अशा मागण्याही पुढे आल्या.
मोर्चानंतर माध्यमांशी संवाद साधताना पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आता ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. “सर्वोच्च न्यायालयातून द्या किंवा सरकारच्या अधिकारात द्या; पण आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

रस्त्यावर उतरून लढा, विधानसभेतही आवाज; न्यायालयीन लढाई सुरूच


धनगर आरक्षणासाठी समाजाची लढाई अनेक पातळ्यांवर सुरू असल्याचे पडळकर यांनी सांगितले. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासोबतच विधानसभेतही आरक्षणाचा मुद्दा लावून धरला जात आहे. त्याचवेळी न्यायालयीन लढाईही सुरू आहे.
पडळकरांच्या म्हणण्यानुसार, धनगर आरक्षणाच्या प्रकरणात उच्च न्यायालयात सरकारने समाजाच्या बाजूने मदत केली होती. मात्र, त्यानंतरही निकाल धनगर समाजाच्या विरोधात गेला. पुढे समाजातील काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले; तिथेही आरक्षणाची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता धनगर समाजाने नव्याने मागणी केली असून, या मागणीवर सरकारने आपली भूमिका मांडणे अपेक्षित असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
‘कोणत्याही मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवा’
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, अशी भूमिका पडळकर यांनी घेतली. सरकारने न्यायालयीन मार्गाने किंवा आपल्या अधिकारांचा वापर करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धनगर समाजाची बाजू ठामपणे मांडावी, आवश्यक संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करावी आणि आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पडळकरांनी केली. “आरक्षण दिल्याशिवाय मार्ग नाही. आता लोक जाब विचारत आहेत आणि आंदोलन करत आहेत,” असे ते म्हणाले.
अहिल्यादेवींच्या नावाने चर्चगेट स्थानक, मुंबईत भव्य स्मारक
आरक्षणासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्याची मागणीही मोर्चातून करण्यात आली. अहिल्यादेवींनी देशभर मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि लोककल्याणकारी कामे केल्याचे पडळकर यांनी सांगितले.
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर अहिल्यादेवींचे स्मारक असल्याचा उल्लेख करत चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर मुंबईत अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, असेही पडळकर म्हणाले.
वीर शिंग्रोबा धनगरांचा इतिहास समोर आणण्याची मागणी
वीर शिंग्रोबा धनगर यांच्या सन्मानाचा मुद्दाही पडळकरांनी उपस्थित केला. इंग्रजांच्या विरोधात लढलेल्या अनेक राष्ट्रभक्तांमध्ये वीर शिंग्रोबा धनगर यांचाही समावेश होता, असा दावा त्यांनी केला.
पडळकरांच्या माहितीनुसार, शिंग्रोबा धनगर यांनी मुंबईशी संपर्क जोडण्यासाठी इंग्रजांना मदत केली होती. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना बक्षीस मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी बक्षीस स्वीकारण्याऐवजी इंग्रजांनी भारतातून निघून जावे, अशी भूमिका घेतली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यात शिंग्रोबा धनगर हुतात्मा झाले, असे पडळकर यांनी सांगितले.
मात्र, वीर शिंग्रोबा धनगर यांचा अपेक्षित सन्मान आजपर्यंत झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या लिंकला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने चर्चगेट स्थानकाचे नामकरण आणि मुंबईतील भव्य स्मारक, तसेच वीर शिंग्रोबा धनगर यांच्या नावाने मार्गाचे नामकरण या मागण्यांसाठी धनगर समाजाचा ‘आक्रोश’ मुंबईत पाहायला मिळाला. आता या मागण्यांवर राज्य सरकार कोणता निर्णय घेते, याकडे धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.