लेकीची पुस्तकं घ्यायची होती… ३२०० रुपयांसाठी आई धावली अन् सचिन तेंडुलकरही मदतीला धावून आला!

बीड : मुलीला एमपीएससीची पुस्तकं घ्यायची होती, पण खिशात होते फक्त संघर्षाचे दिवस… पुस्तकांसाठी लागणारे ३२०० रुपये जमवता न आल्याने मुलगी आठ दिवस आईशी बोलली नाही. अखेर या माऊलीने असा निर्णय घेतला, ज्याने आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी मुलीच्या पुस्तकांसाठी ३ किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि चक्क प्रथम क्रमांक पटकावला!
अंगावर साधी साडी, पायात तुटकी स्लीपर आणि मनात लेकीच्या भविष्यासाठीची जिद्द घेऊन रमाबाई मैदानात उतरल्या. त्यांच्यासमोर तरुण धावपटू होते; पण रमाबाईंच्या मनात एकच ध्येय होतं—मुलीची पुस्तकं घ्यायची आणि तिचं शिक्षण थांबू द्यायचं नाही. स्पर्धा जिंकत त्यांनी ३ हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं.

रमाबाई घरोघरी धुणीभांडी आणि घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना महिन्याला साधारण ९ हजार रुपये मिळतात. या उत्पन्नातून घरखर्च आणि दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवणं अत्यंत कठीण आहे. मात्र, आर्थिक अडचणी असूनही मुलींच्या शिक्षणासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत.


रमाबाईंची धाकटी मुलगी आरती अभ्यासात हुशार असून एमपीएससीची तयारी करत आहे. तिला अभ्यासासाठी काही पुस्तकांची आवश्यकता होती. मात्र, ३२०० रुपये जमवणं शक्य होत नसल्याने रमाबाई हताश झाल्या होत्या. त्याच वेळी ३ किलोमीटरच्या स्पर्धेची माहिती त्यांना मिळाली आणि विजेत्याला ३ हजार रुपये मिळणार असल्याचं कळलं. मुलीच्या पुस्तकांचा विचार करत त्यांनी धावण्याचा निर्णय घेतला.
राहुल द्रविड यांनी कहाणी शेअर केली अन् देशाचं लक्ष वेधलं
रमाबाईंच्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही कहाणी शेअर केल्यानंतर रमाबाई रातोरात चर्चेत आल्या. त्यांच्या जिद्दीचं सर्व स्तरातून कौतुक होऊ लागलं.
सचिन तेंडुलकरने विचारली बुटांची साईज!
रमाबाईंच्या संघर्षाची माहिती क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनीही या माऊलीला मदतीचा हात पुढे केला. रमाबाईंच्या पायाच्या बुटाची साईज विचारून त्यांना दर्जेदार रनिंग शूज पाठवण्याचा निर्णय सचिन यांनी घेतला. त्यामुळे तुटक्या स्लीपरमध्ये धावलेल्या रमाबाईंच्या पुढच्या धावेला आता चांगल्या शूजची साथ मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून ५० हजारांची मदत
रमाबाईंच्या परिस्थितीची माहिती समोर आल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. विशेष म्हणजे, यापूर्वी रमाबाईंचं स्वतःचं बँक खातंही नव्हतं. प्रशासनाच्या पुढाकाराने त्यांचं बँक खातं उघडण्यात आलं.
यानंतर देशभरातील नागरिकांनीही रमाबाईंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. अवघ्या आठवडाभरात त्यांच्या खात्यात दीड लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती आहे.
रमाबाईंच्या डोळ्यांसमोर आता केवळ त्या ३ किलोमीटरच्या शर्यतीची आठवण नाही, तर मुलीच्या मोठ्या स्वप्नांची धाव आहे. ३२०० रुपयांच्या पुस्तकांसाठी सुरू झालेली ही धाव आज देशभरातील माणुसकीला जोडणारी कहाणी बनली आहे.