पप्या शिंदेच्या संपर्कात होते ते ५ जण कोण? प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ३ महिला, २ पुरुष ताब्यात; पोलिसांच्या चौकशीत मोठा उलगडा होणार?


ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकत आहे. हत्येच्या तपासात पोलिसांनी तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या पाचही जणांचा हत्येतील आरोपी पप्या शिंदे याच्याशी गुन्ह्यापूर्वी संपर्क असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या पाच जणांच्या चौकशीतून हत्येच्या कटातील आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मानपाडा येथील कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही त्यांच्यावर वार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके रवाना केली होती. आता तपासाची सूत्रे गुन्हे शाखेकडे देण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपी पप्या शिंदे हा पूर्णेकर यांचा जुना सहकारी आणि जवळचा मित्र असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. हल्ल्याच्या वेळी तो घटनास्थळी उपस्थित होता आणि पूर्णेकर यांना रुग्णालयात घेऊन जाण्यातही त्याने मदत केली होती. मात्र, हल्ल्यावेळी इतर हल्लेखोरांकडून गोळीबार होऊनही पप्या शिंदे जखमी न झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून त्याच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, पप्या शिंदे हत्येच्या आदल्या दिवशी पूर्णेकर यांच्या कार्यालयात पाहणी करण्यासाठी गेला होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. हत्येच्या दिवशी पूर्णेकर कार्यालयात एकटे असल्याची माहिती त्याने साथीदारांना दिली होती का, याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रण आणि दूरध्वनीवरील संपर्काची माहिती तपासली जात आहे.

दुसरीकडे, पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पूर्णेकर यांच्या मुलाने दिलेल्या पुरवणी जबाबात दोघांची नावे नमूद करण्यात आली आहेत. मात्र, हे आरोप असून त्यांची भूमिका तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

बुधवारी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पूर्णेकर यांच्या अंत्यसंस्कारासाठीही मोठी गर्दी झाली होती आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आता तीन महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतल्यानंतर तपासाला आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला आहे. या पाच जणांचा पप्या शिंदेशी नेमका कोणत्या कारणासाठी संपर्क होता, हत्येपूर्वी त्यांच्यात काय चर्चा झाली आणि त्यांना या कटाची माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे आगामी चौकशीत पूर्णेकर हत्या प्रकरणातील आणखी कोणती नावं किंवा माहिती समोर येते, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!