दिवाळीचा आनंद क्षणात राखेत! येडशीत एकाच घरातील तीन पिढ्या संपल्या; दोन मुलींचाही दुर्दैवी अंत, आगीचं कारण अद्याप गुलदस्त्यात


धाराशिव : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले सुखाचे क्षण. मात्र, याच सणाच्या काळात धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात एका कुटुंबावर काळाने घाला घातला. मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. आजी-आजोबा, मुलगा, सून आणि दोन नाती अशा तीन पिढ्यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण येडशी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

धाराशिव शहरापासून जवळ असलेल्या येडशी गावात करंडे कुटुंबाचा किराणा आणि भेटवस्तू विक्रीचा व्यवसाय होता. करंडे किराणा अँड गिफ्ट सेंटर या नावाने त्यांचे दुकान सुरू होते. दुकानाच्या वरच्या मजल्यावर संपूर्ण कुटुंब वास्तव्यास होते. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. काही वेळातच आगीने वरच्या मजल्यावरील घरालाही वेढा घातला. पाहता पाहता आगीचे लोळ आणि धुराचे लोट संपूर्ण घरात पसरले. घरामध्ये अडकलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. धुरामुळे गुदमरून सहा जणांचा मृत्यू झाला.

तीन पिढ्यांचा एकाच दुर्घटनेत अंत

या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे (७५), चंद्रकला उत्तम करंडे (७०), गोविंद उत्तम करंडे (४७), ज्योती गोविंद करंडे (४२), गायत्री गोविंद करंडे (१६) आणि सिद्धी गोविंद करंडे (१५) यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

आगीचं कारण काय? शॉर्टसर्किट की दिवाळीच्या पणत्या?

आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही स्थानिकांकडून विद्युत तारांमधील बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर काही जण दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करत आहेत. मात्र, या दोन्ही शक्यतांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. धाराशिव ग्रामीण पोलीस या घटनेचा तपास करत असून तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

रात्रभर बचावकार्य, अग्निशमन दलाचे प्रयत्न

आगीची माहिती मिळताच गावकरी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रीपासून सकाळपर्यंत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तुळजापूर आणि कळंब येथूनही अग्निशमन दलाची वाहने बोलावण्यात आली. आगीची तीव्रता अधिक असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. गावकऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. मात्र, सहा जणांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. या दुर्घटनेतून एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.

आमदार राणा जगजीतसिंह पाटील मध्यरात्रीच घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी मध्यरात्री अडीचच्या सुमारास येडशी येथे धाव घेतली. त्यांनी बचावकार्याची पाहणी करून संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. तुळजापूर आणि कळंब येथून अग्निशमन दलाची वाहने मागवण्यात आली. गावकरी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर आमदार पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. सहा निष्पाप जीव वाचवता आले नाहीत, ही मनाला अस्वस्थ करणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. करंडे कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तीन पिढ्यांपासून जपलेला व्यवसाय आणि संसार एका आगीत उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या काळात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे येडशी गावातील सणाचा आनंद शोकात बदलला आहे. आगीच्या कारणाचा तपास सुरू असून या दुर्घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!