आधी पुणे, आता मुंबई! महापौरांना बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना धमकीचे ई-मेल पाठवण्याचे प्रकार वाढत असतानाच आता मुंबई महानगरपालिकेलाही अशाच एका गंभीर घटनेचा सामना करावा लागला आहे. पुणे महापालिकेला धमकीचा ई-मेल आल्यानंतर काही तासांतच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयासह अधिकृत वाहन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा संदेश पाठवला. या ई-मेलमध्ये महापौरांच्या अधिकृत गाडीला लक्ष्य करण्याबरोबरच मुंबई महापालिका मुख्यालयातील त्यांच्या केबिनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. मेलमधील मजकूर पाहताच महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, सायबर सेल आणि गुप्तचर विभाग सक्रिय झाला आहे. धमकीचा ई-मेल कोणत्या आयपी अॅड्रेसवरून पाठवण्यात आला, त्यामागे कोणती व्यक्ती किंवा संघटना आहे का, याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. ई-मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

धमकीनंतर मुंबई महापालिका मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनाची तपासणी केली जात आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. महापौरांच्या कार्यालयाबाहेर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांच्या दौऱ्यांदरम्यानही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमहापौर संजय घाडी यांनी चिंता व्यक्त केली. “महापौरांना आलेली धमकी अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी याचा सखोल तपास करून दोषींना तातडीने अटक करावी. तसेच महापौरांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड होऊ नये,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, हा ई-मेल केवळ खोडसाळपणा आहे की यामागे कोणते मोठे षड्यंत्र दडले आहे, याचा तपास सुरू आहे. महापालिका प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे, मुंबईपूर्वी पुणे महापालिकेलाही बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पालिका मुख्यालयाची सखोल तपासणी केली होती. सुमारे दीड तास सुरू असलेल्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. मात्र पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांतील पालिका प्रशासनांना सलग धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
सध्या मुंबई पोलिसांकडून ई-मेलचा मागोवा घेण्याचे काम सुरू असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणात लवकरच महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.