यावर्षी पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आली समोर..

मुंबई : आगामी मॉन्सून हंगामात भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्राने याबाबत माहिती दिली आहे. अपेक हे दक्षिण कोरियामधील हवामान केंद्र असून, ते दर महिन्याला हवामान अंदाज प्रकाशित करते.
एप्रिल ते जुलै या कालावधीत ११ देशांमधील १५ हवामान केंद्रांच्या डेटावर आधारित हा अंदाज तयार केला जातो. भारताच्या हवामानशास्त्र विभागाकडून पुढील महिन्यात मॉन्सूनचा अधिकृत पहिला अंदाज जाहीर केला जाईल, त्यानंतरच पावसाच्या प्रमाणाविषयी अधिक स्पष्टता मिळेल. यावर देखील बरच गणित अवलंबून आहे.
यावर्षी दक्षिण गुजरात, गोवा, किनारी आणि उत्तर कर्नाटक, तेलंगणा तसेच महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची अपेक्षा आहे. मे महिन्यात राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पाऊस कमी राहील.
तसेच केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या विदर्भ भागासह उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या भागांमध्ये मात्र पाऊस काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जून महिन्यात मॉन्सून हंगामाची सुरुवात होईल, त्यावेळी केरळ आणि शेजारील तामिळनाडू भागांत तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मॉन्सून हंगामाने चांगली साथ दिल्यामुळे यंदाही पावसाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, सध्या बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी घटण्याची शक्यता आहे.
यावर्षी असणारा उन्हाळा मागील सगळे रेकॉर्ड तोडेल, असेही सांगितले जात आहे. यंदाचा मॉन्सून शेतीसाठी लाभदायक ठरण्याची अपेक्षा आहे, पण महिन्यावार पावसाच्या वितरणात काही प्रमाणात तूट भासण्याची शक्यता अपेकने वर्तवली आहे.