“ही निवडणूक नाही, फ्रॉड आहे”; राज ठाकरेंचा निवडणूक पद्धतीसह प्रशासनावर घणाघात

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच नेते मंडळींसह सर्व सामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निवडणूक पद्धतीवर आणि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे म्हणाले, निवडणुका जिंकायच्या आणि त्यासाठी वाटेल ते करायचं, असा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. ही निवडणूक नसून फ्रॉड आहे, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण प्रशासन सध्या केवळ सत्तेसाठी मागे लागले आहे. हे काही चांगल्या लोकशाहीचं लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत, असं त्यांनी सरकारला सुनावल आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्ही दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला तेव्हा निवडणूक आयोगाने आमचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. दुबार मतदारांनंतर आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसल्याने आपण दिलेले मतदान आपल्याच उमेदवाराला गेले आहे की नाही, हे कळत नाही. आता सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत ही लोक असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

मतदानाला सुरुवात झाल्यापासून काही ठिकाणी केंद्रावर शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे प्रकार घडत असल्यास त्यावर लक्ष ठेवा. बाहेर पडा, शाई पुसा आणि पुन्हा आत जा, असे प्रकार झाल्यास तात्काळ कारवाई करा. असे ते म्हणाले. आम्ही हे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मतदानादिवशी कडक नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.