टीव्ही बंद करायला लावली अन् राक्षस जागा झाला; दसऱ्याच्या दिवशीच मुलाकडून बापाची निर्घृण हत्या, घटनेने पुणे हादरले..

पुणे : कोथरूडमध्ये दसऱ्याच्या दिवशी बापाचा मुलाकडून खून झाल्याची घटना समोर आली आहे. कोथरूड परिसरातील जय भवानीनगरमध्ये ही घटना घडली आहे. घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे आहे, तर आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पायगुडे कुटुंब जय भवानी नगर येथील चाळ क्रमांक दोनमध्ये वास्तव्यास आहे. दसऱ्याच्या दिवशी, दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला “टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक” असे सांगितले.

यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकू घेऊन हल्ला केला. त्याने वडील तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर धारदार चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणाच्या दिवशीच घराघरात आनंदाचे वातावरण असताना जय भवानी नगरमध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.