शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

मुंबई : कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, यादी जाहीर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आपले नाव तपासता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत सुमारे 6 लाख 30 हजार शेतकऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या लाभार्थ्यांसाठी सुमारे 5 हजार 80 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार असल्याची माहिती आहे.

तांत्रिक अडचणींमुळे रखडलेला लाभ मिळणार?
मागील दोन यादीमध्ये तांत्रिक अडचणींमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही या टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच ई-केवायसीअभावी लाभापासून वंचित राहिलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.


हिंगोलीत 43 हजारांहून अधिक शेतकरी पात्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 525 शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 33 हजार 926 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती दिली होती. राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार सुमारे 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांना वीज आणि पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असून, त्यातून शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल, असेही बावनकुळे यांनी म्हटले होते. आता कर्जमाफीची तिसरी यादी कधी जाहीर होते आणि त्यात कोणत्या शेतकऱ्यांची नावे असतात, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.