‘शारीरिक संबंधांसाठी’ प्रेयसीला जंगलात नेलं; कपडे काढताच लपवलेली सळई बाहेर काढली, डोक्यावर वार करत हत्या! पोलिसांसमोर कटाचा पर्दाफाश

सहारनपूर : शारीरिक संबंधांचे आमिष दाखवून प्रेयसीला जंगलात नेल्यानंतर तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सहारनपूरमध्ये उघडकीस आला आहे. गागलहेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल अहीर गावाजवळ १४ ऑगस्ट रोजी महिलेचा मृतदेह आढळला होता. पोस्टमॉर्टम अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचले. मृत महिलेची ओळख खेडा मवी खुर्द येथील वाजिद यांच्या पत्नी इमराना अशी झाली. तिच्या हत्येप्रकरणी शेजारी शमशाद जोगी याला अटक करण्यात आली आहे.
शहर पोलीस अधीक्षक व्योम बिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, इमराना छुटमलपूर येथील औषध कंपनीत काम करत होती. शमशाद तिला अनेकदा दुचाकीवरून कामावर सोडत आणि परत घेऊन येत असे. याच दरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, पुढे या संबंधांमध्ये वाद निर्माण झाले. इमरानाची मुलगी आफरीन हिचे लग्न ठरले होते. लग्नासाठी इमराना शमशादकडे पैशांची मागणी करत होती. मात्र, तो पैसे देण्यास नकार देत असल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. त्याचवेळी इमरानाचे केसर उर्फ केशव नावाच्या व्यक्तीसोबत कथित संबंध असल्याचा संशय शमशादला होता. त्यावरून तो इमरानावर केशवशी संबंध तोडण्यासाठी दबाव आणत होता.


पोलिसांच्या मते, पैशांची मागणी आणि सततच्या वादामुळे शमशादने इमरानाला ठार करण्याचा कट आखला. १३ ऑगस्टच्या संध्याकाळी तो तिला कंपनीतून घेण्यासाठी गेला. यावेळी त्याने मोबाईल घरी ठेवला होता. तसेच दुचाकीतही काही बदल केले होते, जेणेकरून सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचा माग काढणे कठीण जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.
यानंतर शमशादने शारीरिक संबंध आणि पैसे देण्याचे कारण सांगून इमरानाला नांगल अहीर गावाजवळील जंगलात नेले. तेथे इमराना कपडे काढत असतानाच शमशादने दुचाकीत लपवलेली लोखंडी सळई बाहेर काढली. त्याने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अनेक वार केले. गंभीर जखमांमुळे इमरानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह नाल्यात फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी इमरानाचा मोबाईल सळईने तोडून जवळच्या तलावात फेकण्यात आला. हत्येसाठी वापरलेली सळईही तलावात टाकण्यात आली.
संशय दुसऱ्यावर वळवण्याचा कट
या हत्याकांडातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या मते, शमशादने तपासाची दिशा भरकटवण्याचाही प्रयत्न केला. इमरानाच्या कथित दुसऱ्या प्रियकरावर, म्हणजे केसर उर्फ केशववर संशय जावा, यासाठी त्याच्या गावाच्या आसपासचा परिसर निवडल्याचा पोलिसांचा दावा आहे. हत्या केल्यानंतर शमशाद इमरानाच्या पतीसोबत तिचा शोध घेण्याचे नाटक करत होता.
मात्र, पोलिसांनी इमराना ये-जा करत असलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात शमशादच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. चौकशीदरम्यान पोलिसांचा संशय आणखी बळावला. अखेर २२ ऑगस्ट रोजी हरौडा कटजवळ शमशादला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने इमरानाची हत्या केल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
आरोपीच्या निशाणदेही आणि चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शमशादला न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर पुरावे आणि हत्येच्या कटामागील सर्व बाबींचा तपास सुरू आहे.