१२ डिसेंबरला पवार मोठी घोषणा करणार? निवृत्तीच्या चर्चांवर फडणवीसांचं सूचक उत्तर; एनडीए प्रवेशाबाबतही राजकीय हालचालींची चर्चा!

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. येत्या १२ डिसेंबरला आपल्या ८६ व्या वाढदिवशी पवार निवृत्तीची घोषणा करणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अनेक राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. एवढेच नाही, तर पवार यांच्या पक्षातील काही नेते भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना पवार यांच्या निवृत्तीबाबत आपला विश्वास व्यक्त केला. त्यांच्या विधानामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावे, ही सर्वांची इच्छा आहे. पवार आजही राजकीय आणि सामाजिक कामांमध्ये सक्रिय आहेत. विविध प्रकल्पांमध्ये त्यांना रस आहे. आपण त्यांना जवळून पाहिले असल्याने त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य वाटत नाही. ते आयुष्यात कधीच थांबणार नाहीत आणि काही ना काही सकारात्मक काम करत राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मात्र, पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चेमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीचा मुद्दाही असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पवार यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला व्हावे आणि पक्षातील प्रमुख नेत्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा पर्याय स्वीकारावा, याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. पवार १२ डिसेंबरला ८६ वर्षांचे होत असून त्यांचा राजकीय प्रवास सहा दशकांहून अधिक काळाचा आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदासह त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी स्वतः घेतल्यास त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेशी विसंगती निर्माण होऊ शकते. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि अन्य नेत्यांनी एनडीएसोबत जाण्याचा मार्ग स्वीकारावा, अशा शक्यतेची चर्चा सुरू असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. भाजपच्या नेतृत्वाशी काही नेत्यांनी चर्चा केल्याचाही दावा सूत्रांच्या आधारे करण्यात आला आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका फोनचाही संदर्भ दिला जात आहे. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी यांनी पवार यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी ‘आपण विश्रांती घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू,’ असे मोदी म्हणाल्याचे वृत्त आहे. या विधानाचा पवार यांच्या संभाव्य निवृत्तीशी संबंध जोडला जात आहे.
दरम्यान, फडणवीस यांनी कोयना प्रकल्पातील पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रस्तावावरही भूमिका स्पष्ट केली. वीजनिर्मितीनंतर कोयना प्रकल्पातून सुमारे ६० टीएमसी पाणी समुद्रात सोडले जाते. हे पाणी उपयोगात आणता येईल का, याचा अभ्यास सुरू आहे. ते मुंबईपर्यंत आणता आल्यास कोकणातील जलप्रकल्पांवरील ताण कमी होऊ शकतो आणि मुंबईला पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
मात्र, पाणी उचलून वर आणण्याचे काम सोपे नसून त्यासाठी तांत्रिक अभ्यास आवश्यक आहे. कोणत्याही भागाचे पाणी पळवण्याचा सरकारचा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सातारा-सांगलीतील दुष्काळी भागांप्रमाणे पाणीटंचाई असलेल्या प्रदेशांचा विचार केला जाईल. सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले.
आता १२ डिसेंबरला शरद पवार कोणती भूमिका मांडणार, याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, त्यांच्या निवृत्तीबाबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीतील सहभागाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
