साईभक्तांना मोठा फटका? शिर्डीत पेढ्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढीचे संकेत; काय आहे कारण?

शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याने शिर्डीतील प्रसिद्ध प्रसादाच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. प्रसादाचा पुरवठा करणाऱ्या उत्पादकांनी दरात तब्बल 30 टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने स्थानिक विक्रेते आणि व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
शिर्डीत दररोज मोठ्या संख्येने साईभक्त दर्शनासाठी येतात. दर्शनानंतर घरी परतताना पेढे आणि अन्य प्रसाद घेऊन जाण्याची अनेकांची परंपरा आहे. साईमंदिर परिसरात सध्या 600 हून अधिक प्रसाद विक्रेते व्यवसाय करत आहेत.

जुन्या दरपत्रकामुळे दुकानदारांवर आर्थिक भार
शिर्डी नगरपंचायतीने निश्चित केलेल्या जुन्या दरपत्रकानुसार सध्या प्रसादाची विक्री सुरू आहे. मात्र, साखरेच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादकांनी प्रसादाच्या दरात 30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे दुकानदारांना जुन्या दराने प्रसाद विकताना वाढलेल्या उत्पादन खर्चाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.


नव्या दरांवर लवकरच निर्णय?
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शिर्डीतील व्यापारी संघटना लवकरच महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत प्रसादाच्या नव्या दरांबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
नगरपंचायतीकडून नवीन दरांना मंजुरी मिळाल्यानंतरच प्रसादाचे दर अधिकृतपणे वाढवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे साईभक्तांना प्रसादासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.