महायुतीची आज ‘वर्षा’वर खलबतं; महामंडळांच्या अंतिम वाटपावर होणार मोठी चर्चा

मुंबई : महायुतीच्या समन्वय समितीची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत महामंडळांच्या अंतिम वाटपाबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा पातळीवरील समित्यांचे वाटप आणि राज्यपाल नियुक्त पाच जागांबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे महायुतीतील नेत्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महामंडळांच्या वाटपावर निर्णय होणार?
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांच्या वाटपाबाबत यापूर्वी चर्चा झाली आहे. आता अंतिम यादीवर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. महामंडळे कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि कोणत्या नेत्यांना जबाबदारी मिळणार, याबाबत आजच्या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.


जिल्हा समित्या आणि राज्यपाल नियुक्त जागांवरही चर्चा
महामंडळांच्या वाटपाबरोबरच जिल्हा पातळीवरील समित्यांचे वाटप आणि राज्यपाल नियुक्त पाच जागांचा मुद्दाही बैठकीच्या अजेंड्यावर असल्याचे सांगितले जात आहे. या विविध मुद्द्यांवर महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांमध्ये एकमत होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीतील वरिष्ठ नेते एकाच बैठकीत उपस्थित राहणार असल्याने आजच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.