पुणेकरांची प्रतीक्षा वाढली! मंजुरीला दोन आठवडे, तरी हिंजवडी मेट्रो सुरू नाही; ‘या’ तारखेची चर्चा

पुणे : पुण्यातील महत्त्वाकांक्षी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CMRS) हिरवा कंदील मिळून तब्बल दोन आठवडे उलटले आहेत. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे 12 किमीच्या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतरही मेट्रो अद्याप प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली नाही. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणारे आयटी कर्मचारी आणि पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी पुण्यातील इतर मेट्रो मार्गांना CMRS ची मंजुरी मिळाल्यानंतर अवघ्या 5 ते 7 दिवसांत सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, हिंजवडी मेट्रोच्या बाबतीत 14 दिवस उलटूनही उद्घाटनाची तारीख जाहीर झालेली नाही.

यापूर्वी किती दिवसांत सुरू झाली मेट्रो?
जिल्हा न्यायालय – स्वारगेट : मंजुरीनंतर 5 दिवसांत सेवा सुरू
वनाझ – गरवारे कॉलेज : 6 दिवसांत सेवा सुरू
पिंपरी – फुगेवाडी : 6 दिवसांत सेवा सुरू
गरवारे कॉलेज – रुबी हॉल क्लिनिक : 6 दिवसांत सेवा सुरू
रुबी हॉल क्लिनिक – रामवाडी : 15 दिवसांत सेवा सुरू


मात्र, हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाबाबत PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रो या दोन्ही यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पुण्यातील सर्व मेट्रो मार्गांचे उद्घाटन आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. त्यामुळे हिंजवडी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठीही पंतप्रधानांच्या वेळेची प्रतीक्षा केली जात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
याशिवाय, 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) या दिवशी मेट्रोचे उद्घाटन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तसे झाल्यास CMRS मंजुरीनंतर सर्वाधिक विलंबाने सुरू होणारी पुण्यातील मेट्रो म्हणून हिंजवडी मेट्रोची नोंद होण्याची शक्यता आहे.