ज्याची भीती होती तेच घडलं! राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका, हवामान विभागाचा अलर्ट…


मुंबई : राज्यातून मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारे मदत केली जात असून, कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मात्र, एकीकडे पावसाअभावी ग्रामीण भागात पाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असताना दुसरीकडे ऑक्टोबर सुरू होताच तापमानात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी कमाल तापमान 36.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल 2.5 अंशांनी अधिक आहे. त्यामुळे सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मुंबईकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.

राज्यात सर्वाधिक 37.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद अकोला येथे झाली. मराठवाड्यातही उष्णतेचा प्रभाव जाणवत असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 अंश, परभणीत 35.3 अंश आणि धाराशिवमध्ये 33.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

विदर्भात ऑक्टोबर हिटचा प्रभाव अधिक जाणवत आहे. अकोला येथे 37.1 अंश, अमरावती आणि चंद्रपूर येथे 36.4 अंश, वर्धा 36 अंश, बुलढाणा आणि ब्रह्मपुरी 35.2 अंश, नागपूर 35 अंश, तर वाशिममध्ये 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पाणीटंचाईसोबत रोजगाराचा प्रश्न गंभीर

राज्यातून मॉन्सूनची माघार झाल्यानंतर अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या अधिक गंभीर झाली आहे. विहिरींची पाणीपातळी खालावली असून काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतमजुरांनाही मोठा फटका बसला आहे. दसरा-दिवाळीपूर्वीच ग्रामीण भागातून शहरांकडे मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. शेतात काम उपलब्ध नसल्याने अनेक मजूर कुटुंबांसह पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होत आहेत.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठमधून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसमध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. बालाघाट आणि अजिंठा डोंगररांगांतील गावांमध्येही स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईसह कोकणात येलो अलर्ट

दरम्यान, राज्यात उष्णता वाढत असतानाच मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागांतही उन्हाचा चटका वाढताना दिसत असून, पुढील काही दिवस उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!