राष्ट्रवादीला गुलाबी रंग देणारे रणनीतीकार बदलले; नरेश अरोरांच्या जागी पार्थ आणि सुनेत्रा पवारांचा नवा मास्टरस्ट्रोक..

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, पक्षासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एंट्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काल 19 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाची चर्चा झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती, संघटन बांधणी आणि प्रचार मोहीम यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पुढील दोन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया
पूर्ण करून त्यांच्या कंपनीकडून अधिकृतपणे कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनीतीकार म्हणून काम पाहू शकतात. 2029 च्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

राजकीय वर्तुळात ‘पीके’ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी देशातील अनेक मोठ्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचार मोहिमेनंतर ते चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार, ममता बॅनर्जी, Y. S. Jagan Mohan Reddy, M. K. स्टालिन तसेच आम आदमी पक्ष यांच्यासाठीही निवडणूक रणनीती आखली होती.

दरम्यान, यापूर्वी डिझाईन बॉक्स कंपनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचे काम पाहत होती. कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांसाठी ‘गुलाबी कॅम्पेन’ राबवले होते. विधानसभा निवडणुकीत या प्रचार मोहिमेची मोठी चर्चा झाली होती. मात्र आता पक्ष नव्या रणनीतीसह पुढे जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.