आळेफाटा हादरलं! स्वतःच्या मुलांच्याच जीवावर उठला बाप; चिमुकल्यांचा गळा दाबला, मुलीचा मृत्यू…

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका निर्दयी बापाने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून पाच वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत बचावला आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

मृत मुलीचे नाव हर्षदा सागर शिंदे (वय ३ वर्षे) असे असून आर्यन सागर शिंदे (वय ५) हा मुलगा सुदैवाने बचावला आहे. या प्रकरणी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी सागर शिंदे हा मंगळवारी सकाळी आपल्या दोन्ही मुलांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून मोशी येथील घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो पुणे-नाशिक महामार्गाने नाशिकच्या दिशेने गेला आणि रात्रीच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील आळेखिंड परिसरातील जंगलात पोहोचला. तेथे त्याने दोन्ही मुलांचा गळा दाबून त्यांना जंगलात फेकून दिल्याचा आरोप आहे.

बुधवारी सकाळी आरोपी पुन्हा घरी परतला. मुलांबाबत विचारणा केल्यावर त्याने चाकण येथे खोली घेतली असून मुले तिथेच असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर तो पुन्हा घरातून निघून गेला.

दरम्यान, बुधवारी सकाळी आर्यन शुद्धीवर आल्यानंतर तो रडत रडत महामार्गावर आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला आळेफाटा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव आणि मोशी येथील राहणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला.
तपासादरम्यान मुलगी हर्षदा बेपत्ता असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. आरोपी सागर शिंदे याला चाकण परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने मुलांना जंगलात टाकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला. बुधवारी रात्री हर्षदाचा मृतदेह जंगलात आढळून आला.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपीविरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.