खाकी वर्दीतील सहकाऱ्याचाच संतापजनक चेहरा! महिला पोलिसाचा तीन वर्षे छळ, वारंवार शरीरसुखाची मागणी; अखेर धाडस करून तक्रार, हवालदारावर गुन्हा

मुंबई : कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातच महिला कर्मचाऱ्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना मुंबईत समोर आली आहे. एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा तब्बल तीन वर्षे मानसिक आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप पोलीस हवालदारावर करण्यात आला आहे. आनंद नाईक असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे, पीडित महिला आणि आरोपी दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. या घटनेने मुंबई पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, आनंद नाईक हा गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळी कारणे पुढे करून महिला कॉन्स्टेबलला मानसिक त्रास देत होता. मात्र, हा त्रास केवळ मानसिक छळापुरता मर्यादित राहिला नसल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपी वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत होता. त्याच्या या वागणुकीमुळे पीडित महिलेला सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
तीन वर्षे सहन केला त्रास, अखेर तक्रारीचा निर्णय!

एकाच पोलीस दलात काम करणाऱ्या सहकाऱ्याकडूनच असा त्रास होत असल्याने पीडित महिलेसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, सततच्या छळाला कंटाळून अखेर तिने या प्रकाराविरोधात आवाज उठवण्याचे धाडस केले. संपूर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर मांडत तिने ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हवालदार आनंद नाईकविरोधात गंभीर गुन्हा
महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर ताडदेव पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आनंद नाईक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग, लैंगिक छळ आणि धमकावल्याच्या आरोपांचा यामध्ये समावेश आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्यावर सहकारी महिला पोलिसाचा तीन वर्षे छळ केल्याचा आरोप झाल्याने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खाकी वर्दीतील सहकाऱ्याकडूनच असा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप समोर आल्याने या प्रकरणात तपासातून आणखी काय माहिती पुढे येते, याकडे लक्ष लागले आहे.
