तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिर १८ जुलैपर्यंत दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामांसाठी राहणार बंद…

लोणी काळभोर : येथील तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिरांत तातडीची दुरुस्ती आणि डागडुजीची कामे हाती घेण्यात आली असल्याने कामातील व्यत्यय टाळण्यासाठी तसेच भाविकांची सुरक्षितता यांसाठी मंदिर प्रशासनाने मंदिर १८ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून ते १८ जुलै २०२६ या १ महिन्याच्या कालावधीत रामदरा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहील. या काळात मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, मंदिराच्या आवारात कोणतीही पूजा, धार्मिक विधी किंवा उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी या काळात दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने प्रवास करू नये किंवा गर्दी करू नये, अशी नम्र विनंती ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे अध्यक्ष १००८ श्री महंत हेमंत पुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर पुन्हा भक्तांसाठी कधी खुले केले जाईल, याची अधिकृत घोषणा मंदिर व्यवस्थापनाकडून नंतर केली जाईल.

मंदिर प्रशासनाने या निर्णयामुळे भक्तांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही, सर्व भक्तगण, भाविक आणि शिष्यगणांनी सहकार्य करावे आणि या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
