महाराष्ट्रात पुन्हा राजकीय बिगुल! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, जाणून घ्या मतदानाची तारीख..


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल १६ रिक्त जागांसाठी अखेर भारतीय निवडणूक आयोगाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडीने स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.

या १६ जागांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित मतदारसंघात किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के लोकप्रतिनिधी पदावर असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात हे निकष पूर्ण न झाल्यामुळे या जागांची निवडणूक दीर्घकाळ प्रलंबित होती. मात्र आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व अटी पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केल्यानंतर आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

निवडणुकीची अधिसूचना २५ मे रोजी जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून आहे. अर्जांची छाननी २ जूनला होणार असून ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत पार पडणार आहे.

सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद-जालना, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग यांसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांचा या निवडणुकीत समावेश आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणासोबतच राज्यातील सत्तासमीकरणांवरही या निवडणुकांचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींच्या मतांवर या निवडणुकांचे गणित अवलंबून असल्याने आता राजकीय पक्षांनी पडद्यामागील हालचालींना वेग दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!