पुणे जिल्ह्यात लखपती दिदींची संख्या आता २ लाखांच्या पुढे, महिलांनी केला प्रेरणादायी टप्पा पूर्ण…

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा एक नवा आणि प्रेरणादायी टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील लखपती दीदींची संख्या फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ३४१ इतकी झाली आहे.

तसेच यापैकी ३१४ जणींनी वार्षिक उत्पन्नाचा प्रत्येकी ५ लाख रुपयांचा तर, अन्य ६४ जणींनी प्रत्येकी १० लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक २० हजार ८२६ लखपती दीदी या इंदापूर तालुक्यात आहेत.
देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही लखपती दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिला बचत गटांना पहिल्या टप्प्यात प्रती गट ३० हजार रुपयांचा फिरता निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीची परतफेड करणे अनिवार्य असते.

या निधीच्या आणि बॅंक कर्जाच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यातूनच महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांनी सांगितले.

दरम्यान, फिरत्या निधीची परतफेड केलेल्या महिला बचत गटांना प्रती बचत गट ६० हजार रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी (कम्युनिटी इन्व्हेस्मेंट फंड) उपलब्ध करून दिला जातो. याशिवाय विविध बॅंकाच्या माध्यमातून किमान दीड लाख ते कमाल १० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
उत्पन्ननिहाय लखपती दीदींची संख्या…
१ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या लखपती दीदी – ४१ हजार ६१५. किमान १ व कमाल २ लाख रुपये – १ लाख ६७ हजार ११., किमान ४ ते कमाल ५ लाख – ५३९. किमान ५ ते कमाल १० लाख – ३१४. , १० लाख रुपयांहून अधिक – ६४.
लखपती दीदी योजना काय आहे?
महिला बचत गटांमधील महिलांनी विविध लघुउद्योग सुरू करावेत. जेणेकरून या लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांना वार्षिक उत्पन्न मिळू शकेल. यानुसार ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न (कच्च्या मालाचा खर्च वगळता) प्रत्येकी १ लाख रुपये होते, अशा महिलांना लखपती दीदी म्हटले जाते.