पुणे महापालिकेच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडे वजन असणाऱ्या ‘या’ नेत्यांकडे इच्छुकांच्या फेऱ्या वाढल्या ; कोण आहेत नेते?

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वजन असणाऱ्या नेत्यांकडे फेऱ्या वाढवल्या आहेत.भारतीय जनता पक्षाकडून आगामी महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळवण्याचा मार्ग कोथरूडमधून जात असल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरच्या, कार्यालयाच्या वाऱ्या वाढवल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत शहरभरातील कोथरूडमध्ये वाढलेल्या वाऱ्या हा इच्छुकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपच्या शहर कोअर कमिटीमध्ये चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बोडकर आणि श्रीनाथ भिमाले यांचा समावेश आहे. महिनाभरातून एकदा तरी या कोअर कमिटीची बैठक होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने कोअर कमिटीच्या बैठकांचे सत्र वाढले असून, आगामी निवडणुकीसाठी पक्षात प्रवेश द्यावयाच्या नावांवरही चर्चा होत आहेत. उमेदवारी देताना कोथरूडमधील नेत्यांच्या शब्दाला वजन राहणार असल्याने या नेत्यांची मर्जी राखण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे.
दरम्यान या पुणे महापालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन या दोन्ही नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी भाजपच्या इच्छुकांची तारेवरची कसरत सुरू आहे.
