रात्रीचा फोन, लॉजमधील खोली आणि पहाटे मृत्यू! महिन्यात ५ वेळा एकाच ठिकाणी गेलेल्या २२ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने गूढ वाढलं; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

गुवाहाटी : गुवाहाटी विद्यापीठातील २२ वर्षीय विद्यार्थिनी निमिशा ठाकुरियाच्या संशयास्पद मृत्यूने आसाममध्ये खळबळ उडाली आहे. धरारपूर परिसरातील एका होमस्टेमध्ये ती गंभीर अवस्थेत आढळली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणात तिच्यासोबत असलेल्या २६ वर्षीय आशिक अलीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या जबाबाची पडताळणी सुरू आहे.
निमिशा समाजशास्त्राची विद्यार्थिनी होती. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री ती आशिकसोबत धरारपूरमधील होमस्टेमध्ये थांबली होती. पहाटेच्या सुमारास तिला गंभीर अवस्थेत गाराल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर तिला गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आशिकचा दावा काय?


पोलिसांच्या माहितीनुसार, आशिकने निमिशाने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा सत्य मानलेला नसून, घटनेच्या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. निमिशाच्या मृतदेहावर काही जखमांच्या खुणा आढळल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महिन्यात पाच वेळा त्याच होमस्टेमध्ये भेट
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. निमिशा आणि आशिक हे दोघेही याच होमस्टेमध्ये एका महिन्यात तब्बल पाच वेळा आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे, दोघांना योग्य कागदपत्रे आणि पडताळणीशिवाय तेथे राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी होमस्टेच्या व्यवस्थापनाचीही चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, होमस्टे जयंत साकी नावाच्या व्यक्तीला दरमहा सुमारे १ लाख ३० हजार रुपये भाड्याने देण्यात आले होते. घटनेच्या वेळी निमिशा आणि आशिक खोली क्रमांक १० मध्ये होते. निमिशा बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर आशिक तिला उठवण्याचा प्रयत्न करत रडत असल्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
मृत्यूआधी आईला फोन; तपासात नवा महत्त्वाचा धागा
दरम्यान, ताज्या माहितीनुसार, निमिशाने मृत्यूपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास आईला फोन केल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे. या फोनमध्ये तिने आपल्यावर मारहाण झाल्याचे आणि छातीवर प्रहार करण्यात आल्याचे सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. फोननंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या दाव्याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
नागरिकांचा रस्ता रोको, सखोल तपासाची मागणी
घटनेनंतर धरारपूर परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत रस्ता रोको केला. निमिशाच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा केले असून, निमिशा आणि आशिकची भेट कशी झाली, त्या रात्री दोघांच्या हालचाली काय होत्या, तिच्या मृत्यूपूर्वी नेमके काय घडले आणि शरीरावरील जखमांचे कारण काय, या सर्व बाबी तपासल्या जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील पुढील निष्कर्षांनंतरच या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.